Sunday 28 September 2014

फुलांच्या दुनियेत…. ! 


                         एक राधा नावाची छोटी खूप गोडुली मुलगी असते.  तिला गोष्टींची मस्त मस्त पुस्तकं वाचायला खूप आवडायची.  ती एकदा तिच्या रूम मध्ये असंच एक छानसं पुस्तक वाचत मस्त पहुडलेली होती. तिच्या आवडीची परिची गोष्ट होती ना त्या पुस्तकात. मग काय, राधा अगदी भान हरपून वाचत होती…पुस्तक वाचता वाचता मधेच एकदम तिचे लक्ष खिडकीबाहेर तिच्या घराच्या बागेत उडणाऱ्या एका फुलपाखराकडे गेलं. केशरी, पिवळसर रंगाचे त्यावर निळे ठिपके असलेले एक खूप सुंदर फुलपाखरू राधाच्या बागेमध्ये उडत होतं. ते कधी या फुलावरून त्या फुलावर जाई तर कधी खिडकीत येवून बसे. फुलपाखराचं हे बागडणं राधाला खूप आवडलं. ती पटकन उठून अंगणात तिच्या बागेत आली. 
                       राधाची बाग रंगीबेरंगी फुलांनी अगदी भरून गेली होती.  लाल, नारंगी गुलाबाची फुलं, शुभ्र पांढरी मोगऱ्याची टपोरी फुलं, पिवळीशार शेवंतीची, मोठी झुपकेदार जास्वंदीची, मधेच नाजूक अबोलीची. ती रोज तिच्या आईबरोबर या फुलांसाठी गाणं म्हणायची. त्यांना मायेनं पाणी घालायची. आणि आज तर अगदी गंमतच, तिची हि बागेतली सुंदर फुलं बघायला एक गोडुल फुलपाखरू पण आलं होतं.  ते उडत उडत कधी अबोलीवर, कधी गुलाबावर तर कधी मोगार्यावर बसत होतं.  राधा त्याला पहायला त्याच्या जवळ गेली कि ते दुसरीकडेच उडे. तिला खूप मज्जा वाटत होती.  ती बराचवेळ बागेत त्या गोडूल्या फुलपाखराच्या मागे पळत होती … त्याला पकडायला नाही बरं का… त्याला नीट बघायला. फुलपाखराला पण तिची हि रंगीबेरंगी बाग खूपच आवडली होती, ते हही खूप मज्जा करत होतं. मग थोड्या वेळानं घरातून आईची हाक आली म्हणून राधा पटकन आत पळाली. आणि फुलपाखरू हि उडत दुसरीकडे गेलं. राधाला मात्र ते खूप आवडलं होतं. त्या दिवशी झोपताना पण तिला तेच आठवत होतं,  त्याचे सुंदर मऊ पंख, त्यावरचे मखमली रंग  हे डोळ्यात साठवूनच ती झोपी गेली.


                    दुसऱ्या दिवशी सकाळी राधा उठून, छान आवरून गजर्या साठी फुलं घ्यायला बागेत आली तर काय गम्मत, ते गोडुलं फुलपाखरू दिसलं कि तिला… आता तर ती जाम खुश झाली.  ती त्याच्या मागं मागं पळू लागली, ते जिकडे जाइल तिथे धावत सुटली.  हे फुलपाखरू पण खूप भारी बरं का, बिलकुल घाबरलं नाही, उलट ते राधाशी बोलायला लागलं.  शुभ्र मोगऱ्याच्या फुलावर बसून त्यानं राधाला हाक मारली, "ए ताई…."   राधा पळतच आली. 
ते तिला म्हणालं, "तुझी हि बाग, त्यामधली ही सुंदर रंगीबेरंगी फुलं मला खूप आवडली" त्यावर राधा पटकन त्या फुलपाखराला म्हणाली,  "……आणि मला तुझे मखमली पंख खूप आवडले,  किती गोड आहेस तू … ! एकदम मस्त आहेत रे तुझे हे पंख…  मला पण असा मस्त मस्त रंगाचा, सुंदर डिझाईनचा फ्रॉक घालायला खूप मज्जा येयील.  तू देशील मला तसा भारी फ्रॉक……पण  मी सांगेन तसेच रंग आणि तशीच डिझाईन बरं का…"   

                मग काय… ते फुलपाखरू लगेच तयार झालं.  ते राधाला म्हणालं, "त्यात काय एवढं, नक्की देतो तुला तसा फ्रॉक…पण त्यासाठी तुला माझ्याबरोबर आमच्या फुलांच्या देशात यावं लागेल बरं का, ते हि माझ्याबरोबर उडत उडत…" राधा लगेच म्हणाली, "चल, आत्ताच जावू आपण. मी आईला सांगून येते" असे म्हणून राधा लगेच पळत बाहेर आली. फुलपाखरू म्हणालं, "पकड माझ्या पंखाना…"  आणि दोघे उडत उडत उंच उंच आकाशात ढगांच्या पलीकडल्या खूप खूप सुंदर फुलांच्या एकदम मोठ्या बागेत पोहोचले. तिथे उतरताच राधा तर अगदी बघतच राहिली, चमचमणारी जांभळी, लाल, गुलाबी, नारंगी, पांढरी, निळी, पिवळी अशी सगळ्याच रंगांची खूप खूप फुलं त्या बागेत होती. तिच्या घरातल्या बागेपेक्षा खूपच मोठी आणि वेगळी होती ही बाग.

                  फुलापाखरू तिला म्हणाले, "हं, ताई आता सांग मला, तुला तुझ्या फ्रॉक वर कोणकोणते रंग हवेत. "  राधा ला काहीच सुचेना, सगळेच रंग तिला छान वाटत होते, हि एवढी बाग, इतकी सारी फुलं, हे एवढे रंग, तिने या आधी कधीच बघितले नव्हते. तरी पण ती हुशार होती बरं  का… , ती म्हणाली, "मला पिवळ्या रंगाचा फ्रॉक त्यावर  चमचमणारी निळी जांभळी फुलं हातात पकडलेली, लाल रंगाची बाहुली, असं पाहिजे. " फुलपाखरू म्हणालं "हे घे, आत्ता देतो" आणि काय गम्मत, राधाने सांगितलेला अगदी तसाच तिचा फ्रॉक झाला. तिला खूपच मज्जा वाटली. ती म्हणाली, "वॉव, किती मस्त आहे रे हे…एकदम धम्माल, मला हवा तसा फ्रॉक मिळाला, खूप मस्त वाटतंय " त्यावर फुलपाखरू म्हणाले, " अगं ताई,  मला पण माझे हे सुंदर पंखांवरचे रंग या स्पेशल बागेतूनच मिळाले…हि खूप वेगळी बाग आहे बरं का… आहे कि नाही मज्जा…चल आता, तुझी आई वाट बघत असेल, पकड माझ्या पंखाना आपण तुझ्या घरी परत जावू…" मग दोघे परत तिच्या घरी आले, राधा त्या फुलपाखराला म्हणाली, " ए, मी तुला आजपासून  'गुंडूल्या' म्हणू, आपण दोघं मित्र बरं का, आता तू हवे तेव्हा माझ्या या बागेत येत जा, मला पण मज्जा येयील तुझ्याशी खेळायला… चल, मी आता आईला आपली फ्रॉक ची गम्मत सांगते, उद्या भेटूया,  टा टा…" असे म्हणून ताई घरात जाते, आणि फुलपाखरू त्याच्या त्याच्या घरी… 

तर अशा या फुलांच्या रंगीबेरंगी दुनियेत हरवायला आली नि नाही मज्जा… !

                                                                                                                 - अश्विनी वैद्य       
२८/९/१४